बारामती येथील दत्त मंदिर रातोरात गायब; नागरिकांमध्ये उसळली संतापाची लाट.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.

बारामती येथील दत्त मंदिर रातोरात गायब; नागरिकांमध्ये उसळली संतापाची लाट.
प्रशासन मात्र मूग गिळून गप्प
बारामती वार्तापत्र
बारामतीतील प्रसिद्ध दत्त मंदिर रातोरात गायब झाले असुन प्रशासन मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घडलेल्या प्रकाराने नागरिक मात्र संतप्त आहेत.बारामतीत श्री दत्त आणि महादेव यांचे गेली 40 वर्षा पासून नीरा डावा कालव्याच्या भरावाच्या एका बाजूला असलेले दत्त मंदिर काल दि. 26 ऑगस्ट रोजीच्या रात्री अचानक हटविण्यात आले. त्यामुळे आज दि 27 ऑगस्ट रोजीच्या गुरुवारी सकाळी सकाळी दत्त दर्शनाला आलेल्या भाविकांना मंदिरच जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्याने मोठा धक्का बसला.
गेल्या काही दिवसांपासून बारामती शहरातून जाणाऱ्या नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरणाचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे.
त्याच धरती वर नीरा डावा कालव्याला लागूनच असलेले दत्त मंदिर नीरा डावा कालव्याच्या कामासाठी अचानक मध्यरात्रीत हटवल्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा विषय असल्याकारणाने भाविकांमधून प्रचंड चीड व्यक्त होत आहे. आता हे मंदिर हटवल्या नंतर ते पुन्हा आहे त्याच जागी बांधून देणार का..? किंवा त्यासाठी दुसऱ्या कोणत्या पर्यायी जागेचा प्रशासन विचार करणार का.? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
दरम्यान या कारवाई बाबत नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप कोणते ही स्पष्टीकरण आलेले नाही. ज्या प्रभागातील मंदिर काढण्यात आले आहे त्या प्रभागाच्या नगरसेवकालाच या कामाची माहिती नाही. व जे नगरसेवक त्या प्रभागाचे नाहीत अशा इतर नगरसेवकांचा या मंदिर पाडण्यात हात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
बारामतीचे नेते बारामती मधील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू रात्रीतच का पाडत आहेत असे नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पूर्वी ही नगरपालिकेची असणारी ऐतिहासिक कमान रात्रीतच जमिनोधोस्त केली होती. त्यानंतर या मंदिरावर विकासकामाच्या नावाखाली हातोडा मारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
या संदर्भात मंदिर व्यवस्थापन प्रमुख डॉ.पंजाबराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता या मंदिराचे दुसऱ्या पर्यायी जागेत स्थलांतर करावे लागणार असुन मंदिर व्यवस्थापन करणाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन एका जबाबदार नगरसेवकाने दिले होते.
मात्र अचानकपणे रातोरात मंदिर पाडल्याने आमच्या भावनांशी प्रशासन खेळत असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना या संबंधी विचारले असता मंदिर नगरपालिकेच्या वतीने पाडण्यात आले नसून या संदर्भात नगरपालिकेचा काहीही संबंध नाही असे मत व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.
बारामतीच्या इतिहासात ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या घटना सध्या बारामतीत घडत आहेत. तसेच जे पुढारी आणि नेते नगरपालिकेची ऐतिहासिक कमान पाडण्यात अग्रेसर होते तेच नेते व पुढारी यांनी हे मंदिर पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामती करांनो सावधान पुढचा हातोडा चौकावर बसणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.