बारामती एमआयडीसी मध्ये उद्योजकाकडून वारंवार पैसे उकळले, तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक..
लहान उद्योजकाला धमकावून ८५ हजार वसूल; एकाला अटक ; ०३ दिवसांची पोलीस कोठडी, बारामती तालुका पोलिसांची कारवाई..

बारामती एमआयडीसी मध्ये उद्योजकाकडून वारंवार पैसे उकळले, तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक..
लहान उद्योजकाला धमकावून ८५ हजार वसूल; एकाला अटक ; ०३ दिवसांची पोलीस कोठडी, बारामती तालुका पोलिसांची कारवाई..
बारामती वार्तापत्र
कटफळ (ता.बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे.
फिर्यादी हे बारामती एमआयडीसी मध्ये येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून , शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला ‘बारामतीचे डॉन’ असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले. हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते.
एप्रिल २०२५ पासून आरोपींनी ‘तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही’ अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी १० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून ‘दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन’ अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवले व धमकीखाली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.
पुढे १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन १३ हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला.या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून, ‘आता पैसे दिले नाहीत तर जिवे मारू’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत एकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 03 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
ही कारवाई संदीपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अप्पर पोलीस अधिक्षक, सुदर्शन राठोड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेंद्र बन्ने, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, संतोष कांबळे, निलेश वाकळे यांनी केली आहे.






