बारामती एमआयडीसी मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी भूखंड राखीव ठेवावा- धनंजय जामदार
टप्पा -1 किंवा टप्पा -2 मध्ये पाच एकर जागा राखीव ठेवावी

बारामती एमआयडीसी मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी भूखंड राखीव ठेवावा- धनंजय जामदार
टप्पा -1 किंवा टप्पा -2 मध्ये पाच एकर जागा राखीव ठेवावी
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र वेगाने विकसित होत असून लहान मोठ्या उद्योगांची दिवसेंदिवस भर पडत आहे. औद्योगिकरण व नागरिकरणामुळे या संपूर्ण भागात कचऱ्याची समस्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली असून त्याच्या योग्य विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी एमआयडीसी प्रशासनाने टप्पा -1 किंवा टप्पा -2 मध्ये पाच एकर जागा राखीव ठेवावी अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट व कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र खाडे उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले, बारामती एमआयडीसी मुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून प्लास्टिक, रासायनिक व इतर अनेक प्रकारचा घातक कचरा रोज निर्माण होत आहे.
नागरीकरणामुळे घरगुती कचऱ्याचे देखील प्रमाण कमालीचे वाढत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवून दिला जातो यामुळे घातक धुराचे लोट औद्योगिक क्षेत्रात वारंवार पाहायला मिळत आहेत.
पर्यावरण व आरोग्यासाठी हे अतिशय धोकादायक आहे. यामुळे या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. भविष्यातील कचऱ्याची समस्या उग्र स्वरूप धारण करणार हे स्पष्ट दिसत आहे.
यासाठी बारामती MIDC औद्योगिक क्षेत्रात सॉलीड वेस्ट मैनेजमेंट प्रोजेक्ट उभारण्याची आवश्यकता भासणार आहे. याचा विचार करून एमआयडीसी ने आत्ताच या नियोजित प्रकल्पासाठी किमान पाच एकर जागा राखीव ठेवावी अशी आमच्या बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनची मागणी असून उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने नियोजित घनकचरा प्रकल्पासाठी जागा राखीव ठेवण्याची केलेली मागणी योग्य असून असोसिएशनचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी असोसिएशनच्या शिष्यमंडळाला ग्वाही दिली.