बारामती एसटी कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग
पुण्याला जाणाऱ्या एसटी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल! खासगी वाहनांमधून करावा लागत आहे प्रवास
बारामती एसटी कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग
पुण्याला जाणाऱ्या एसटी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल! खासगी वाहनांमधून करावा लागत आहे प्रवास
बारामती वार्तापत्र
आजपासून बारामतीतील एसटी कर्मचा-यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आज सकाळपासून एकही एसटी रस्त्यावर नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सर्वाधिक एसटीची वाहतूक बारामतीहून पुण्याला असते, आज सकाळपासूनच एसटीची वाहतूक थंडावली असल्याने बारामतीच्या बसस्थानकावर येणा-या प्रत्येक प्रवाशाला एक तर प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे किंवा खाजगी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. त्यामुळे आज राज्यातील तब्बल ७२ आगारांचे काम बंद होते. बंद असलेल्या कामामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
समितीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे. त्यामुळे सोमवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतरच संघटनेची भूमिका स्पष्ट होईल.
काल संध्याकाळपासूनच बारामतीच्या बसस्थानकावर संपाचे सावट जाणवत होते. आज शंभर टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एसटीची वाहतूक पार कोलमडली. आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी सुरु असलेल्या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आजपासून कर्मचारी कामापासून दूर राहिले. बारामती व एमआयडीसी अशा दोन्ही आगारांच्या मिळून 120 बसेस आहेत. 250 चालक व जवळपास 220 वाहक या आगारात कार्यरत असून जवळपास बारा हजार प्रवाशांची दररोज या माध्यमातून राज्याच्या कानाकोप-यात वाहतूक होते. सामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून ओळखणा-या लालपरीचे चाक थंडावल्याने आज अनेकांचे हाल झाले.
काही खाजगी वाहनचालकांनी जास्तीचे दर आकारुन पुण्याला गाड्या नेल्या पण त्यांची संख्या मर्यादीत असल्याने प्रवाशांची सोय झालीच नाही, अनेकांनी प्रवासाचा बेत रद्द केला तर ज्यांना जाणे अनिवार्य होते त्यांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला. रेल्वे सेवा बंद असल्याने एसटीवरच प्रवाशांचे प्रवासाचे बेत अवलंबून होते, मात्र आज एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
शासनाच्या ढिसाळ कामामुळे तब्बल ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने दखल घेतली असून सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये महाधीवक्त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.