बारामती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी
सन्मान प्रेरणादायी ठरेल

बारामती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी
सन्मान प्रेरणादायी ठरेल
बारामती वार्तापत्र
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त बारामती येथील महात्मा फुले कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा जयंती सोहळा सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा ताई तावरे विराजमान होत्या. प्रमुख व्याख्यात्या म्हणून प्रा. डॉ. रंजना नेमाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्री सबलीकरणातील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या समाजासाठी किती प्रेरणादायी आहेत, हे त्यांनी प्रभावीपणे मांडले.
या प्रसंगी बारामती नगर परिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला महात्मा फुले ट्रस्टचे अध्यक्ष निलेश टिळेकर यांच्यासह किशोर हिंगणे, रवींद्र बनकर, विशाल हिंगणे, सुनीता शहा, कमल हिंगणे, शोभा बनकर, मंगलताई बोरवके, गीता होले, सुनीता लिंगे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेविका व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत पूनम पिसे यांनी केले, तर प्रास्ताविक वनिता बनकर यांनी मांडले. सूत्रसंचलनाची जबाबदारी योगिता काळोखे यांनी समर्थपणे पार पाडली आणि कार्यक्रमाचा समारोप सुवर्णा बनकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या जयंती सोहळ्यास मंडळातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






