
बारामती ग्रामीण भाग अंधारात; दररोज ४ तास भारनियमन
महिलांवर याचा अधिक ताण पडत आहे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली असून, गावठाण फीडर वगळता वाड्या-वस्त्यांवर दररोज तब्बल चार तास अतिरिक्त भारनियमन होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या नाराजीचा सूर आता तीव्र होताना दिसत आहे.
महावितरणकडून ज्या गावांमध्ये शेतीपंप नाहीत, त्या गावांना ‘गावठाण फीडर’ अंतर्गत तुलनेने सलग वीजपुरवठा केला जात आहे. मात्र शेतीपंप असलेल्या भागांतील वाड्या-वस्त्यांवर सायंकाळच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत ‘फोर्स लोडशेडिंग’ करण्यात येत आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीज खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
दिवसभर शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जात असला तरी तोही वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी आधीच त्रस्त आहेत. त्यातच सायंकाळी होणाऱ्या भारनियमनामुळे जनावरांची देखभाल, दूध काढणे, स्वयंपाक, घरकाम यांसारखी आवश्यक कामे अडचणीत येत आहेत. विशेषतः महिलांवर याचा अधिक ताण पडत आहे.
सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी सुरू असल्याने या समस्येची तीव्रता आणखी वाढली आहे. अभ्यासाच्या महत्त्वाच्या वेळेत वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही चिंतेत आहेत.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या अतिरिक्त भारनियमनाबाबत प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा याबाबत मौन बाळगून असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
“हे अतिरिक्त भारनियमन आणखी किती दिवस सहन करावे लागणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, तात्काळ तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.






