बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील 100 हेक्टर होणार बिबट्या सफारी वनविभागाकडून शिक्कामोर्तब
परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी होणार.

बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील 100 हेक्टर होणार बिबट्या सफारी वनविभागाकडून शिक्कामोर्तब
परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी होणार.
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामती मतदारसंघात होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील 100 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी बिबट सफारीसाठी 60 कोटींच्या निधीची तरदूत केलेली आहे.
अर्थसंकल्पात बिबट सफारीचा समावेश व्हावा यासाठी पुणे वनविभागाने महिन्याभरापूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती. त्याआधीच बारामतीच्या गाडीखेल परिसराचे सर्वेक्षण ही करण्यात आले होते, असं राहील पाटील यांनी सांगितलं. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्र आहे त्याच जागी सुरू राहणार असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं.
बिबट सफारीमुळे येथील परिसराचा कायापालट होणार असून या बिबट सफारीमुळे येथील स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून येथील स्थानिकांचे वनविभागाचे या बिबट सफारीमुळे मोठया प्रमाणात जीवनमान उंचावणेस देखील मदत होणार असलेची माहिती देखील राहुल पाटील यांनी दिली आहे.
यामुळे पर्यटकांना चक्क बिबट्याच्या भेटीला जाण्याची संधी मिळणार आहे. आफ्रिकन सफारी किंवा गुजरात येथील सिंह सफारीबाबत अनेकांनी ऐकले असेल. त्याच धर्तीवर पुणे वनविभागाद्वारे ‘बिबट्या सफारी’चे नियोजन केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात ‘बिबट्या सफारी’ सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात येत होती. आता प्रत्यक्षात याची सुरवात होणार असून पुणे जिल्ह्याला यामुळे नवी ओळख प्राप्त होणार आहे. या ‘बिबट्या सफारी’मुळे येथील परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तसेच यातून होणाऱ्या उत्पन्नाचा वापर बिबट्यांच्या देखभालीसह संवर्धनाकरिता केला जाईल. असे वन विभागामार्फत सांगण्यात आले.
याबाबत उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, ‘‘जिल्ह्यात बिबट्यांचा सर्वाधिक वावर जुन्नर येथे आहे. अलीकडच्या काळात बारामती वनपरिक्षेत्र तसेच, दौंड व इंदापूर या वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलेले असून मानव-बिबट्या संघर्षात ही वाढ पाहायला मिळते. बिबट्यांच्या पुनर्वसन व संवर्धन याबरोबरच जनजागृतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.’’
वाढत्या शहरीकरणामुळे माणसाच्या वस्तीत बिबट्या आढळल्याच्या घटना जिल्ह्यात अनेकवेळा घडल्या आहेत. यामुळे माणूस-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाद्वारे समिती तयार करण्यात आली असून अनेक जनजागृती उपक्रम ही राबविण्यात येत आहेत. तसेच वाचविण्यात आलेल्या बिबट्यांना उपचार किंवा संवर्धनासाठी पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येते. अशा बिबट्यांसाठी नैसर्गिक अधिवास विकसित करण्यात येईल. बिबट्या सफारीद्वारे अशा बिबट्यांना पाहता येणार आहे. दौंड, इंदापूर, बारामती येथील कान्हेरी वन उद्यान, मयुरेश्र्वर अभयारण्य, भादलवाडी, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आदी परिसरामध्ये ‘इको टुरिझम सर्किट’ विकसित करण्यात येणार आहे. यामुळे पुणे वनविभागाच्या निसर्ग पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाचे प्रयत्न अधिक बळकट होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा- अतुल बेनके
बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी केली आहे. पुणे पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जुन्नरला बिबट्या सफारीचा प्रकल्प जाहीर झाला होता. पण कालांतरांनं तो प्रकल्प बारामतीला जात असल्याचं वन खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं अतुल बेनकेंनी सांगितलं.