स्थानिक

बारामती तालुक्यातील गोजूबावीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम बंद पाडले..!

बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप

बारामती तालुक्यातील गोजूबावीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम बंद पाडले..!

बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप

बारामती वार्तापत्र

बारामती संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात गावोगावी गंमतीजंमती झालेल्या आहेत. यापूर्वी भूसंपादनाच्या प्रक्रियेत असणाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेताना काहींना पायघड्या तर काही शेतकऱ्यांचे हात कोरडे राहतील अशा क्लृप्त्या करून ठेवल्या आहेत. वासुंदे गावापासून ते सराटी गावापर्यंत असे बरेच किस्से घडलेले आहेत. त्यातील एक किस्सा आता गोजुबावीचा आहे..!

या गावाचा भूसंपादनाच्या मोबदल्याचा निवाडा दोन वेळा करण्यात आला आहे, त्यामध्ये दुसऱ्या वेळी करण्यात आलेला निवाडा हा पहिल्यावेळी जाहीर केलेल्या निवाड्यातील रकमेमध्ये जवळपास निम्म्याने घट आणणारा ठरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांचा पालखी महामार्गाला विरोध नाही. शासनाच्या योजनांना तर अजिबातच नाही. फक्त काम सुरू होण्याअगोदर एक निवाडा आणि नंतर अगदी वर्षा-दिड वर्षाने दुसरा निवाडा केल्याबदद्ल त्यांच्या मनात कटुता आहे, एवढेच..!

गोजुबावी व कटफळ या गावातील बाधित शेतक-यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार या प्रमाणे नुकसान भरपाईबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र पुन्हा शेतक-यांना नवीन नोटीस प्राप्त झाली असून निवाडा दुरुस्त करुन सदरची नोटीस आल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. बेकायदा दुरुस्त केलेला निवाडा रद्द करा, पूर्वीच्या निवाड्यानुसारच मोबदला द्यावा, मोबदला दिल्याशिवाय काम सुरु करु नये अशा मागण्या शेतक-यांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे काम करु देणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. या बाबत 29 सप्टेंबर रोजी अर्ज दिलेला असतानाही उपविभागीय अधिका-यांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु ठेवल्याचाही आरोप करण्यात आला.

महामार्ग कायदयानुसार सहा महिन्यानंतर निवाडा दुरुस्त करता येत नाही, असे असताना दोन वर्षांनंतर निवाडा दुरुस्त करुन गोजुबावी व कटफळ गावातील शेतक-यांना बाजारभावाच्या मूल्याहून कमी किंमतीच्या नोटीसा कशा काय पाठवल्या गेल्या असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मूल्यांकन नियमानुसारच…

मूल्यांकनाचा विषय फक्त गोजुबावीपुरताच मर्यादीत आहे. शासकीय मूल्यांकन हे योग्यच आहे, त्याच कमी मूल्यांकनाचा विषय नाही- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.

Related Articles

Back to top button