स्थानिक

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बिजोत्सव साध्या पद्धतीने; दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली

सर्व कार्यक्रम रद्द करून धार्मिक कार्यक्रमांवरच भर

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बिजोत्सव साध्या पद्धतीने; दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली

सर्व कार्यक्रम रद्द करून धार्मिक कार्यक्रमांवरच भर

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात प्रति देहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात केले जाते. मात्र यंदा हा बिजोत्सव अत्यंत साध्या आणि भावनिक वातावरणात साजरा केला जात आहे.

बारामती परिसरावर मोठा प्रभाव असलेले दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण बारामती तालुका शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर डोर्लेवाडी ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेत यंदाचा बिजोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून गावकऱ्यांनी सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

दरवर्षी या बिजोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर कुस्त्यांचा आखाडा, बैलगाडा शर्यती, तमाशा, आर्केस्ट्रा आदी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करून धार्मिक कार्यक्रमांवरच भर देण्यात आला आहे.

बिजोत्सवानिमित्त दुपारी बारा वाजता श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकांवर पुष्पवृष्टी अर्पण करण्यात येणार असून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहे. ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

डोर्लेवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दिवंगत अजित पवार यांच्याविषयीची आदरभावना आणि गावकऱ्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे.

Back to top button