बारामती तालुक्यातील निरावागज परिसरात बिबट्याची दहशत – सीसीटीव्हीत स्पष्ट कैद, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
दोन ते तीन शेळ्या आणि एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे.

बारामती तालुक्यातील निरावागज परिसरात बिबट्याची दहशत – सीसीटीव्हीत स्पष्ट कैद, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
दोन ते तीन शेळ्या आणि एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील निरावागज येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्याने दोन ते तीन दिवसांच्या काळात दोन ते तीन शेळ्या आणि एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना समोर येण्यामागे संतोष कुंभार यांच्या येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली.२३ नोव्हेंबर रोजी पहाटे १.४५ वाजता त्यांच्या घरासमोर असलेल्या वडाच्या झाडाजवळील कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे दिसून आला. ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे या परिसरातील जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि परिसरात सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाकडून लवकरच या परिसरात गस्त वाढवण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.






