क्राईम रिपोर्ट

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई, चोरीला गेलेले हरवलेले १८ मोबाईल मूळ मालकांना परत

एकूण ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचे

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई, चोरीला गेलेले हरवलेले १८ मोबाईल मूळ मालकांना परत

एकूण ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचे

बारामती वार्तापत्र 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे हरविलेले मौल्यवान मोबाईल शोधून काढत माळेगाव पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कार्य केल्याचे समोर आले आहे. एकूण ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचे १८ मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या हरविलेल्या वस्तूंबाबत दाखल तक्रारींच्या अनुषंगाने शोधकार्य राबविण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आदेश दिला होता त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन लोखंडे यांनी प्राप्त तक्रारींचे परीक्षण करून गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांच्याकडे तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोबाईलचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली. मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास करत महाराष्ट्रातील विविध भागांतून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये बारामती तालुक्यातील सांगवी येथील जयदीप बाळासाहेब कदम यांचा १ लाख १६ हजार रुपयांचा सॅमसंग गॅलॅक्सी अल्ट्रा २३, माळेगाव येथील राजवर्धन सतिश कुंभार यांचा ४२ हजार ९९९ रुपयांचा सॅमसंग गॅलॅक्सी एस २३, रामनगर येथील शंकर सायबू पवार यांचा ३६ हजार रुपयांचा विवो व्ही ३०, जळगाव सुपे येथील कल्याण जाधव यांचा २९ हजार ९९९ रुपयांचा ओप्पो एफ २७ प्रो यांसह विविध मॉडेलचे मोबाईल समाविष्ट आहेत.

तसेच पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गजानन कानडे, सांगवी येथील निलेश जगताप, कुतवळवाडी येथील अक्षय कुतवळ, शिवनगर येथील पूर्वा खारतोडे, कांबळेश्वर येथील सुप्रिया खलाटे, पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेले रतन पवार, ढाकाळे येथील सुप्रिया सूर्यवंशी, माळेगाव खुर्द येथील सुनिल शिर्के, पणदरे येथील गणेश महामुनी, पुणे येथील नागेश खाडे, गोफणेवस्ती येथील गोरख गायकवाड, बाबुर्डी येथील अशोक लव्हे, कऱ्हावागज येथील निलेश कुंभार आदी नागरिकांचे मोबाईलही शोधून काढण्यात आले.

शनिवारी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त सर्व १८ मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले. अचानक हरविलेल्या मोबाईलमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. माळेगाव पोलीस ठाण्याने तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून अल्पावधीत केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी कौतुक केले.

Back to top button