बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ! मिनीबस चोरीचा गुन्हा उघडकीस

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ! मिनीबस चोरीचा गुन्हा उघडकीस
७ लाखांचा मुददेमाल हस्तगत
क्राईम; बारामती वार्तापत्र
माळेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत मिनीबस चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. माळेगाव परिसरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष निर्देश दिले होते.
त्यानुसार पथकाने तपास आणि गस्तीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते.
घटनेचा तपास
२८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान, राजहंस चौक, शनी मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून फोर्स मोटर्स कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस चोरीला गेला होता. याबाबत सचिन बाबासो कोकरे (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित प्रदिप रामचंद्र शिंदे (रा. हावागज, ता. बारामती) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली, आणि पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीची चोरीला गेलेला मिनीबस जप्त केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२३/२०२५ अन्वये BNS कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पांढरे करत आहेत. या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकात पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे आणि अमोल वाघमारे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
नागरिकांमध्ये समाधान
माळेगाव परिसरातील वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, या कारवाईमुळे पोलिसांप्रती विश्वास वाढला असून, परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. पोलिसांनी आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी गस्त आणि तपास आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.