स्थानिक

बारामती तालुक्यातील मोरगाव–सुपे मार्गावर भीषण अपघात; डिग्री प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

बारामती तालुक्यातील मोरगाव–सुपे मार्गावर भीषण अपघात; डिग्री प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील मोरगाव–सुपे मार्गावर शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी हर्षदा जनार्दन खैरे (वय २०) हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा खैरे व तिची मैत्रीण या सोमेश्वरनगर येथील महाविद्यालयात डिप्लोमा शिक्षण पूर्ण करून पुढील डिग्री प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी आल्या होत्या. मॅकेनिकल डिप्लोमाचे अंतिम वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेशासंदर्भातील काम आटोपून त्या आपल्या गावी परतत होत्या.

यावेळी हर्षदा दुचाकीवरून घरी जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर फेकली गेली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. अपघातानंतर काही काळ मोरगाव–सुपे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

Back to top button