बारामती तालुक्यातील सांगवीच्या बालआनंद बाजारात दीड लाखांची उलाढाल !!
लहानथोरांनी लुटला खरेदीचा आनंद .

बारामती तालुक्यातील सांगवीच्या बालआनंद बाजारात दीड लाखांची उलाढाल !!
लहानथोरांनी लुटला खरेदीचा आनंद ..
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवी येथे आज बालआनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मा श्री विजयराव तावरे यांच्या शुभहस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री दीपक तावरे पाटील, उपाध्यक्षा सौ जयंतीताई तावरे, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांच्या अंगी व्यवहारज्ञानाचे व विक्रीचे कौशल्य वृद्धिंगत व्हावे. पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञानाचे धडेही विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मिळावेत या हेतूने शाळेने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे या शब्दात श्री विजयराव तावरे यांनी उपक्रमाचा गौरव केला.
त्याचबरोबर पालकांच्या विश्वासाने, शिक्षकांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेने सर्वच क्षेत्रात एक वेगळी उंची निर्माण केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थ ,पालक व शिक्षकांचे कौतुक केले.
बालआनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील ताजा भाजीपाला, फळभाज्या , ताजी ताजी रसदार फळे , चिंचा, बोरे, आवळे इ. रानमेवा तर खाऊ गल्लीमध्ये घरी बनवलेले शेंगदाणा लाडू, डाळीचे लाडू, बेसन लाडू, चिक्की, खोबऱ्याच्या वड्या, इडली सांबर, आप्पे, मंचुरियन, पाणीपुरी, सोलकढी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, फुटाणे, खारे शेंगदाणे, जुली, भजी, बटाटेवडे, मिसळ, पावभाजी, पॅटीस, समोसे , भोपळ्याचे थालीपीठ, ढोकळा, पोहे तसेच शीतपेयामध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत ,रसना, लस्सी, मठ्ठा ,कुल्फी ,आईस्क्रीमआदि प्रचंड खाद्यपदार्थांची रेलचेल झाली होती. त्यामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ झाली.
त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने,स्टेशनरीव मनोरंजनासाठी फनी गेम्स यांचेही स्टॉल लावण्यात आलेले होते.
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते .आजी-आजी घ्या ना ताजी भाजी …. दहाला पेंढी … लय लय भारी — बिर्याणीची चवच न्यारी ! अशा आरोळ्यांनी छोट्या बालविक्रेत्यांनी शाळेचा परिसर दणाणून सोडला होता.
पालकांनी व ग्रामस्थांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देताना हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली त्यामुळे या बालन आनंद बाजार मध्ये सुमारे १५००००/- रुपयांची उलाढाल झाली. गावच्या आठवडे बाजारापेक्षाही मोठा बाजार आज शाळेत भरला आहे. अशी सहज भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व पालकांनी व्यक्त केली.
मुख्याध्यापक मा श्री संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील श्री संतोष पाथरकर, श्री दिगंबर बालगुडे, श्री मारुती जगताप, श्री राजेंद्र सोनवणे, श्री यासीन शेख, श्रीम.सुरेखा माटे, सौ संगीता झगडे, सौ सुनीता खलाटे, सौ भाग्यश्री कणढोणे, सौ रेखा लकडे,सौ. अश्विनी कुंभार, सौ शांता बालगुडे, सौ. सोनाली तांदळे,सौ सीमा साळुंखे, सौ दिपाली साळुंके, सौ हर्षदा जगताप या शिक्षकांनी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.