बारामती तालुक्यात ट्रकच्या चाकाखाली दुचाकी; एका भावाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर
मोरगावहून सुपेकडे परतत असताना भीषण अपघात; सुपे पोलिसांकडून तपास सुरू

बारामती तालुक्यात ट्रकच्या चाकाखाली दुचाकी; एका भावाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर
मोरगावहून सुपेकडे परतत असताना भीषण अपघात; सुपे पोलिसांकडून तपास सुरू
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा सख्खा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ मोरगाव येथून दुचाकी (एमएच ४२ ई १८७८) वरून सुपेकडे आपल्या घरी परतत होते. अहिल्याबाई चौकात वळण घेत असताना दुचाकीचा तोल जाऊन ती रस्त्यावर घसरली. त्याचवेळी मोरगावच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक (एमएच १० सीआर ४१९९) जवळ आल्याने दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली. या भीषण अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ सुपे–चौफुला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.







