स्थानिक

बारामती तालुक्यात महाआवास विशेष मोहिमेअंतर्गत 262 घरकुलांचे काम पूर्ण

एका दिवसात 11 घरकूलांसाठी जागेचा प्रश्न सोडविण्यात यश आले.

बारामती तालुक्यात महाआवास विशेष मोहिमेअंतर्गत 262 घरकुलांचे काम पूर्ण

एका दिवसात 11 घरकूलांसाठी जागेचा प्रश्न सोडविण्यात यश आले.

बारामती वार्तापत्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती विकास गटात १५ मार्च पासून राबविण्यात आलेल्या महाआवास विशेष मोहीमेत २६२ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. या विशेष मोहिमेचा समारोप ३१ मे रोजी ‘एक दिवस घरकुल लाभार्थीसाठी’ या अभियानाद्वारे करण्यात आला.

पंचायत समिती बारामतीच्या २५ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ३१ मे रोजी प्रत्यक्ष भेटी देऊन लाभार्थी मेळावे घेतले. लाभार्थ्यांचा शोध व त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गृहभेटीदेखील घेण्यात आल्या. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासह पंतप्रधान, रमाई, पारधी व शबरी आवास योजनेअंतर्गत प्रलंबित व अपूर्ण असलेली घरकुले वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

अभियानात गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संपर्क अधिकारी, शाखा अभियंता यांनीही सहभाग नोंदवला.विशेष मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक २६२ घरकुलांचे काम बारामती तालुक्यात झाले आहे. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेची १८८ आणि रमाई आवास योजनेची ७४ घरकुले अंतर्भूत आहेत.

बारामती तालुक्यात आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ६६१ इतकी घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी ३ हजार ४५३ घरकुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. ९२५ भूमिहीन लाभार्थ्यांपैकी २४८ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

एक दिवस घरकुल लाभार्थीसाठी’ मोहिमेद्वारे घरकूल योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. एका दिवसात 292 कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. घरकूलांचे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचे प्रबोधन करण्यासोबत अडचणीदेखील जाणून घेण्यात आल्या. एका दिवसात 11 घरकूलांसाठी जागेचा प्रश्न सोडविण्यात यश आले. यानिमित्ताने शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळाली.

तालुक्यात ७३ टक्के घरकुल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. निराधार, गरीब व भूमिहीन नागरिकांना राहण्यासाठी हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत असल्याने लाभार्थ्यांकडून समाधानाची प्रतिक्रीया येत आहे. विस्तार अधिकारी संजीव मारकड, ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी घरकुलांचे काम प्रगतीपथावर आणण्यासाठी परिश्रम घेत असल्याने या कामांना गती मिळाली आहे.

डॉ. अनिल बागल, गट विकास अधिकारी- या संपूर्ण अभियानात एकूण 1275 लाभार्थ्यांना भेटी देण्यात आल्या, तर 75 मेळावे घेण्यात आले. या कालावधीत 600 लाभार्थ्यांची नवी प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामेदेखील लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामस्तरावरील प्रत्येक कर्मचाऱ्याने विशेष प्रयत्न केल्याने गरजूंना हक्काचे घर देता आले.

Related Articles

Back to top button