बारामती तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी
सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक, उमेदवारांनी केला गावी जल्लोष
बारामती तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी
सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक, उमेदवारांनी केला गावी जल्लोष
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील एकोन पन्नास ग्रामपंचायतींसाठी 15 रोजी मतदान झाले होते त्याची आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या टप्प्यात पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचा वरचष्मा झाल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळी दहा वाजले पासून एमआयडीसीतील रिक्रीएशन हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. निकाल जसजसे वॉर्डनिहाय बाहेर पडतील तसे उमेदवारांची धाकदुखी वाढत होती. यंदा जिल्हाधिका-यांनी गुलाल उधळण्यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यास प्रतिबंध केल्याने उमेदवारांनी आपल्या गावात जाऊन जल्लोष करण्यास धन्यता मानली विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढली.
तहसिलदार विजय पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, राहुल आवारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सांगवीत राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचा तर चंदरराव तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला, अनिल तावरे, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे यांनी ताकद लावत सांगवी येथे राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली. ही निवडणूक तालुक्यात प्रतिष्ठेची होती.
कांबळेश्वर मध्ये माजी सभापती करण खलाटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधातील सुरेश खलाटे व गणपत खलाटे यांच्या पॅनेलला आठ जागा तर करण खलाटे यांच्या पॅनेलला 3 जागांवर समाधान मानावे लागले.
को-हाळे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळविला. खोमणे यांच्या पॅनेलला 8 जागा मिळाल्या. सुनील भगत यांच्या पॅनेलला 4, लालासाहेब माळशिकारे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या.
वडगावनिंबाळकर मध्ये सुनील ढोले, धैर्यशिल राजेनिंबाळकर व अनिलकुमार शहा यांच्या पॅनेलला अकरा जागा मिळाल्या. संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या.
होळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पॅनेलला अकरापैकी दहा जागा मिळाल्या. त्यांनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभव पत्करावा लागला.
निंबूत ग्रामपंचायतीत नऊ जागा प्रमोद काकडे व सतीश काकडे यांच्या पॅनेलला तर सहा जागा गौतम काकडे व महेश काकडे यांच्या पॅनेलला मिळाल्या. सतीश काकडे व प्रमोद काकडे यांनी सत्ता राखली असली तरी प्रथमच त्यांच्या विरोधात सहा जागा निवडून आल्या.
झारगडवाडीमध्ये छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर व बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. पंधरा जागांपैकी पैकी अकरा जागांवर त्यांनी विजय मिळविला.