राजकीय

बारामती दूध संघात खळबळ; चेअरमन-व्हाईस चेअरमन बदलासाठी खा.पार्थ पवार यांना अठरा संचालकांचे पत्र

स्व अजित पवार हे दूध संघात कार्यकाळ संपल्यानंतर वेगवेगळ्या गावाना संधी देत न्याय देत होते

बारामती दूध संघात खळबळ; चेअरमन-व्हाईस चेअरमन बदलासाठी खा.पार्थ पवार यांना अठरा संचालकांचे पत्र

स्व अजित पवार हे दूध संघात कार्यकाळ संपल्यानंतर वेगवेगळ्या गावाना संधी देत न्याय देत होते

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघात सध्या मोठी राजकीय हालचाल सुरू असून विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या पदांमध्ये बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात संघाच्या काही संचालकांनी खासदार पार्थ पवार यांना लेखी निवेदन देत सध्याच्या पदाधिकाऱ्यांना पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.तसेच संचालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली आहे.

विद्यमान चेअरमन यांचा कार्यकाळ संपला तरीही त्यांना पुन्हा चेअरमन पद देण्यात आल्याने इतर संचालकांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.दिनांक २० मार्च २०२६ रोजी देण्यात आलेल्या या पत्रात संबंधित संचालकांनी नमूद केले आहे की, बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये ठराविक कालावधीनंतर नेतृत्वात बदल करण्याची परंपरा आहे. त्यानुसार दूध संघातही विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन इतर संचालकांना संधी द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, आम्ही सर्व संचालक मंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा सन्मान राखूनच ही मागणी करत आहोत. संघाच्या कामकाजात सर्वांना समान संधी मिळावी, तसेच नेतृत्वात बदल झाल्यास संघ अधिक सक्षमपणे पुढे जाईल, असा विश्वासही संचालकांनी व्यक्त केला आहे.

या निवेदनावर अठरा संचालकांच्या स्वाक्षऱ्या असून त्यामुळे दूध संघाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.आगामी काळात या मागणीवर काय निर्णय होणार,तसेच विद्यमान पदाधिकारी यावर काय भूमिका घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका संचालकाला विद्यमान चेअरमनचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालकाला चेअरमन करण्याचे आश्वासनही दिले होते.परंतु अजित पवार यांचे अपघाती निधन झाले त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या.स्व अजित पवार हे दूध संघात कार्यकाळ संपल्यानंतर वेगवेगळ्या गावाना संधी देत न्याय देत होते.परंतु आता या निर्णयात खंड पडला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान,या घडामोडींमुळे बारामतीतील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button