बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीस लोकनेते अजितदादा पवार नामकरण
“अजितदादा अमर रहे, अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीस लोकनेते अजितदादा पवार नामकरण
“अजितदादा अमर रहे, अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
बारामती वार्तापत्र
बारामती दूध संघ तसेच माळेगाव नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.
त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली आणि या संस्थांनी सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावला. त्यांच्या या कार्याची कायमस्वरूपी जपणूक व्हावी, या भावनेतून बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बारामती दूध संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संघाच्या नावात बदल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यानुसार संघाचे नवे नाव “सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, बारामती” असे ठेवण्यात आले आहे.
या निर्णयाची माहिती संघाचे अध्यक्ष संजय रामचंद्र कोकरे व उपाध्यक्ष दत्तात्रय सदाशिव वावगे यांनी दिली. बैठकीस संघाचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष कोकरे यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांच्या सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीमुळेच बारामती दूध संघ आज राज्यात आदर्श ठरला आहे.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचेही नामांतर करण्याबाबत संचालक मंडळात सकारात्मक चर्चा सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संचालक योगेश जगताप यांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या नव्याने उभारल्या जात असलेल्या प्रशासकीय इमारतीस
“लोकनेते अजितदादा पवार प्रशासकीय इमारत, माळेगाव बुद्रुक” असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अधिकृत घोषणा नगराध्यक्ष सुयोग सातपुते व उपनगराध्यक्षा वृषाली तावरे यांनी केली.
ही घोषणा दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्तिकलश पूजन कार्यक्रमावेळी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात भावनिक व श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गटनेते जयदीप तावरे, माजी सरपंच दिपक तावरे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अजितदादा अमर रहे, अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उचललेले हे पाऊल सहकार चळवळ व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना यावेळी अशोकराव तावरे यांच्यासह अनेक नागरिकांनी व्यक्त केली.






