बारामती नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे पालक व विद्यार्थ्यांना दुर्गंधीतून करावा लागतोय प्रवास
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

बारामती नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे पालक व विद्यार्थ्यांना दुर्गंधीतून करावा लागतोय प्रवास
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद हद्दीतील घारे इस्टेट परिसरात नगरपरिषदेच्या निष्काळजी व ढिसाळ कारभाराचा फटका थेट शाळकरी मुले, पालक व स्थानिक नागरिकांना बसत आहे. या परिसरातील बाल विकास मंदिर व देशपांडे हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या पालकांना गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र दुर्गंधीतून प्रवास करावा लागत आहे.
घारे इस्टेट परिसरातील ड्रेनेज चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात घाण पसरली आहे. रस्त्यावर साचलेले सांडपाणी व त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लहान मुले दररोज याच रस्त्यावरून शाळेत ये-जा करत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी व पालकांनी याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
उलट स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली काडी (यंत्रसामग्री) नादुरुस्त असल्याचे कारण देत काम करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे परिसरातील रहिवासी तीव्र दुर्गंधीमुळे हैराण झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय होणार? तसेच पुढील पाच वर्षांत शहराच्या मूलभूत सुविधांची अवस्था काय असेल? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन ड्रेनेज दुरुस्ती व स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.






