बारामती नगरपरिषदेच्या विद्युत ठेकेदाराचा मनमानी कारभार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या आदेशालाही केराची टोपली!
काही खांबांना अद्याप विद्युत पुरवठाच देण्यात आलेला नाही.

काही खांबांना अद्याप विद्युत पुरवठाच देण्यात आलेला नाही.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील विश्वास नगर, समर्थनगर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून स्ट्रीट लाईटच्या कामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात काही ठिकाणी खांब उभे करण्यात आले असले तरी दिवे बसवलेले नाहीत, तर काही खांबांना अद्याप विद्युत पुरवठाच देण्यात आलेला नाही. परिणामी, संपूर्ण परिसर अंधारात असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या परिसरात अंधारामुळे लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून चालताना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
नगरपालिका निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांनी या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणूक पार पडून नगरसेवक निवडून आल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.नवनिर्वाचित नगरसेवकांकडून या ठेकेदारा बर संपर्क साधूनही काम कधी होणार यांचे उत्तर मिळत नसल्याचा आरोप होत आहे.काही वेळा फोन उचलले जात नाहीत, तर उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नागरिक
सांगतात.
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे बारामती विद्युत प्रभागाचे प्रमुख सिद्धार्थ मोरे यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपासून या प्रभागातील लाईट संदर्भातील समस्या वारंवार मांडण्यात आल्या आहेत. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. संबंधित अधिकारी व वरिष्ठांकडेही हे प्रश्न प्रभावीपणे मांडले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सिद्धार्थ मोरे व साईयोग या ठेकेदार यांच्यात लागेबांधे असल्याच्या चर्चाही बारामतीत रंगू लागल्या आहेत.यापूर्वीही अनेक नगरसेवक ठेकेदाराच्या कामगिरीवर नाराज होते,मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष या ठेकेदाराला काळया यादीत टाकणार का?नागरिकांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण?व संबंधित अधिकाऱ्याची बदली होणार का?या गंभीर प्रश्नाकडे नगराध्यक्ष कशा पद्धतीने लक्ष देतात,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्नांसाठी किती प्रभावीपणे न्याय मिळवून देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
चौकट
संबंधित ठेकेदार गेले नऊ वर्ष प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार करत असून या ठेकेदाराचे ऑडिट करावे अशी नागरिकांची मागणी आहे.नवनिर्वाचित नगरसेवकांचे जर ऐकत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?त्यामुळे आता या ठेकेदारावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






