बारामती नगरपरिषदेतील सुरक्षारक्षक गायब; ७० सुरक्षारक्षकांची नियुक्ती, प्रत्यक्षात मात्र मोजकेच हजर..!
१३ सुरक्षा रक्षक पोलिस यंत्रणेच्या मदतीसाठी नियुक्त

बारामती नगरपरिषदेतील सुरक्षारक्षक गायब; ७० सुरक्षारक्षकांची नियुक्ती, प्रत्यक्षात मात्र मोजकेच हजर..!
१३ सुरक्षा रक्षक पोलिस यंत्रणेच्या मदतीसाठी नियुक्त
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेने सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून ७० सुरक्षारक्षक नेमले आहेत. प्रत्यक्षात मात्र मोजकेच सुरक्षारक्षक हजर राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळत आहे.
बारामती नगरपरिषदेने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून ७० सुरक्षारक्षक नेमले आहेत. यातील १३ सुरक्षा रक्षक पोलिस यंत्रणेच्या मदतीसाठी नियुक्त केले आहेत. उर्वरीत सुरक्षारक्षक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान, तिरंगा सर्कल, बाबूजी नाईक वायदा अशा ठराविक ठिकाणी तैनात केले आहेत.
मात्र ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तिथेच सुरक्षा रक्षक नसल्याची नागरीकांची तक्रार आहे.
बारामती वार्तापत्रने याचा तपास केल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक गैरहजर आढळून आले. तर काहीजण कर्तव्याच्या ठिकाणी न थांबता मोबाईल बघताना आढळले. तर काहीजण नेमणुकीची जागा सोडून इतरत्र फिरत असल्याचे दिसून आले. पोलिस यंत्रणेसोबत नेमलेले सुरक्षारक्षकही दिसून आले नाहीत. त्यामुळे जनतेच्या पैशांची मोकार उधळपट्टी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या चौकांमध्ये सुरक्षारक्षक गायब!
बारामती शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये सुरक्षा नसल्याचेही निदर्शनास आले. भिगवण चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, सातव चौक, ढवाण चौक, शिवाजी चौक अशा काही ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. मात्र अनेक चौकांमध्ये सुरक्षा रक्षक अनुपस्थित असल्याचे चित्र आहे.
विभाग प्रमुख रजेवर दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असतं सुरक्षा विभागाचे प्रमुख अधिकारी सध्या रजेवर असल्याचे समजते. प्रभारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे अपूर्ण माहिती असल्याने नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून नागरिकांच्या करातून येणाऱ्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






