स्थानिक

बारामती नगरपरिषदेसाठी अजित पवार गटाची उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची दाट शक्यता!

एक दिवस असताना इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली

बारामती नगरपरिषदेसाठी अजित पवार गटाची उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची दाट शक्यता!

एक दिवस असताना इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतल्या. या मुलाखतीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी निवडणूक धोरणाबाबत संकेत दिले, मात्र नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठीचे नावं जाहीर न करताच सस्पेन्स कायम ठेवला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ एक दिवस असताना इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत असल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कोणाला उमेदवारी मिळणार व कोण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार.

मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी भवनात पार पडल्या. बैठकित अजित पवार यांनी दोन्ही ठिकाणी झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि कोणालाही उमेदवारी मिळाली तरी पक्षाईक भावना बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे सूचनाही दिले.

बारामती नगराध्यक्षपद खुले असून तब्बल 21 जणांनी दावेदार म्हणून आपली नावे पुढे केली आहेत. अनेक अनुभवी आणि प्रभावी नेते यासाठी प्रयत्नशील आहेत. नगरसेवक पदांसाठीही मोठी गर्दी असून इच्छुकांनी अजित पवार यांच्याकडे जोरदार मागणी लावली आहे. माळेगावचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असून तिथेसुद्धा अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.

उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांत उमेदवार निश्चितीची लगबग सुरू आहे. भाजप आणि शिवसेना देखील या निवडणुकीत तयारीत असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांनीही शनिवारी सकाळी गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

पवार यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले असल्याने आघाडी करुन निवडणूक लढविण्याचे संकेत स्थानिक नेतृत्वाने दिलेले आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुध्द समविचारी पक्षांची आघाडी यातच प्रामुख्याने बारामती नगरपरिषदेसाठी निवडणूक होईल, अशी चिन्हे आहेत. यादीच जाहीर होत नसल्याने इच्छुक गॅसवर असून शेवटच्या क्षणापर्यंत यादीच जाहीर होणार नसल्याने अनेकांची मोठी कोंडी झालेली आहे.

नेमका काय निर्णय होणार हेच समजत नसल्याने अनेक इच्छुक वाट बघत बसल्याचे दिसले. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत यादीच जाहीर न करण्याची खेळी केल्याने अनेकांची अडचण झाल्याचे दिसले. शनिवारी नगरसेवकपदासाठी 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजअखेर नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवकपदासाठी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Back to top button