बारामती नगरपरिषद अॅक्शन मोडमध्ये;आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास होणार दंडात्मक कारवाई
वाहनांमध्ये कचरा देण्याचे आवाहन

बारामती नगरपरिषद अॅक्शन मोडमध्ये;आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास होणार दंडात्मक कारवाई
वाहनांमध्ये कचरा देण्याचे आवाहन
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील नगरपरिषद हद्दीत या पुढील काळात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी कारवाई करण्याचा मोठा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नगरपरिषदेने यात नमूद केले आहे की, बारामती शहरात नगरपरिषदेमार्फत दैनंदिन घंटागाडीमार्फत कचरा संकलन केले जाते. नगरपरिषदेची वाहने नियमित कचरा जागोजागी जाऊन संकलन करतात. दैनंदिन कचरा संकलन करुनसुध्दा अनेक ठिकाणी नागरिक उघडयावर कचरा टाकतात. अनेक ठिकाणी दैनंदिन कचरा टाकला जातो. अशा ठराविक ठिकाणांची यादीच नगरपरिषदेने निश्चित केलेली आहे.
या पुढील काळात नगरपरिषदेकडून स्वच्छता मार्शलची नियुक्ती करण्यात आली असून या पथकास कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, शहर विद्रुपीकरण कायदा तसेच महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम आणि मुंबई पोलीस अधिनियम अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
बारामती शहर स्वच्छ, सुंदर व हरित असावे या उद्देशाने नगरपरिषद प्रशासनाने आता स्वच्छता मार्शलची सेवा घेण्याचा निर्णय घेतला असल्याने हे मार्शल वारंवार कचरा टाकला जाणा-या ठिकाणी लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत. दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये कचरा देण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने केले आहे