बारामती नगरपालिका स्वीकृत नगरसेवकपदी या चार नावांवर शिक्कामोर्तब

बारामती नगरपालिका स्वीकृत नगरसेवकपदी या चार नावांवर शिक्कामोर्तब
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अखेर नियुक्त्या जाहीर झाल्या असून, सोमनाथ गाजाकस, अमोल कावळे, राहुल वाघोलीकर आणि गणेश जोजारे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमुळे बारामतीच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना आणि अपेक्षांना उधाण आले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या निवडी सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय अनुभवाच्या आधारे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवक हे निवडणुकीतून न येता त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियुक्त केले जात असल्याने, नगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सोमनाथ गाजाकस हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. स्थानिक नागरी समस्या, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांची ठाम भूमिका ओळखली जाते.
अमोल कावळे हे युवकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून संघटनात्मक बांधणी आणि युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे युवकांचे प्रश्न नगरपालिकेच्या व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राहुल वाघोलीकर यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
गणेश जोंजारे हे प्रशासकीय समन्वय, सामाजिक कार्य आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभागासाठी परिचित आहेत.





