बारामती नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार नगरसेवकांमध्ये चर्चांना उधाण
सदस्य आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी सर्वसाधारण सभा हा अत्यंत महत्त्वाचा मंच आहे.

बारामती नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार नगरसेवकांमध्ये चर्चांना उधाण
सदस्य आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी सर्वसाधारण सभा हा अत्यंत महत्त्वाचा मंच आहे.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका डिसेंबर 2025 मध्ये एकाच टप्प्यात पार पडल्या. राज्यभरात नवीन पदाधिकारी व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक पालिकांमध्ये सर्वसाधारण सभांचे आयोजन करून शहर विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे.
काही ठिकाणी दोन-दोन सर्वसाधारण सभा घेऊन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मात्र,बारामती नगरपालिकेत अद्याप सर्वसाधारण सभा घेण्यात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कोणती कामे प्राधान्याने करावीत, याबाबत स्पष्ट दिशा मिळत नाही. शहरातील भुयारी गटार व्यवस्था, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, डांबरी व काँक्रिटीकरण रस्ते यांसारख्या मूलभूत गरजांबाबत निर्णय प्रक्रियेला उशीर होत आहे.परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे.
सदस्य आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी सर्वसाधारण सभा हा अत्यंत महत्त्वाचा मंच आहे. दरमहा मासिक सभा घेणे ही प्रशासन व अध्यक्षांची कायदेशीर जबाबदारी आहे.
तसेच वार्षिक बजेट बैठक घेणेही कायद्यानुसार आवश्यक असले तरी, त्याआधी सर्वसाधारण सभा घेऊन शहराच्या गरजा, पुढील वर्षातील प्राधान्यक्रम आणि विकास आराखडा यावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे.
सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या अपेक्षा आणि सदस्यांचे प्रस्ताव विचारात घेतल्यास अर्थसंकल्प अधिक परिणामकारक व लोकाभिमुख होऊ शकतो.
अलीकडे झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे काही प्रमाणात विलंब झाला, हे मान्य असले तरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता आणखी विलंब परवडणारा नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय व प्रशासनाने तात्काळ सर्वसाधारण सभा बोलावून प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी, सदस्य-प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वसाधारण सभा तातडीने घेणे ही काळाची गरज आहे. अध्यक्ष व प्रशासन यांनी सकारात्मक पाऊल उचलून लवकरात लवकर सभा आयोजित करावी,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.






