स्थानिक

बारामती नगरपालिकेची सुधारीत प्रभाग रचनेचे कार्यक्रम जाहीर,इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु!

सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश.

बारामती नगरपालिकेची सुधारीत प्रभाग रचनेचे कार्यक्रम जाहीर,इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु!

सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश.

बारामती वार्तापत्र,

एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगरपालिकेची प्रभागरचना निश्चित करण्यासाठी प्रक्रीया सुरु केली आहे.

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे.सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणी दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात जाहीर करण्यासं सांगितलं होतं. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं हे परिपत्रक जारी केलं आहे. आजच सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथं देखील स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितलं आहे.

बारामती नगरपरिषदेचीही ही प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबविण्यात आली होती, त्या टप्प्यावरून पुन्हा सुरु करण्यात येत आहे.
त्यासाठी प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्यासाठी सुधारीत कार्यक्रम जाहीर करणेत येत आहे.

या सुधारीत कार्यक्रमानुसार, बारामती नगर परिषदेने प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर 10 मे 2022 (मंगळवार) ते 14 मे 2022 (शनिवार) पर्यंत कार्यालयीन वेळेत आक्षेप हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. तरी उक्त प्रभाग रचनेच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती/ सूचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबंधित मुख्याधिकारी यांचेकडे दि. 14 मे, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही.

विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर जिल्हाधिकारी हे 23 मे 2022 (सोमवार) पर्यंत कार्यवाही करणार आहेत. तसेच प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे 30 मे (सोमवार) पर्यंत अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त हे 6 जून 2022 (सोमवार) रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. बारामती शहराची अंतिम प्रभाग रचना ही प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्येवर ठरविण्यात येणार आहे.

तसेच अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना ही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे वृत्तपत्रे, स्थानिक पातळी, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषदेच्या वेबसाईटवर 7 जून 2022 (मंगळवार) पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे.

प्रभाग रचनेच्या मसुद्यावर हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरीकांना सुनावणीकरीत उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे.

बारामती नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

बारामती नगरपालिकेची आगामी निवडणूक एका प्रभागात दोन नगरसेवक या पध्दतीने होणार आहे हे आता जवळपास निश्चित झाले आहे. बारामतीतील प्रभागरचना विचारात घेता दोन नगरसेवक संख्या असलेले 18 व तीन नगरसेवक संख्या असलेला एक असे 19 प्रभाग बारामतीत होतील अशी शक्यता आहे. बारामतीत नगरसेवकांची संख्या निवडून येणारे 39 व स्वीकृत चार अशी 43 इतकी असेल, तर नगराध्यक्ष नगरसेवक निवडतील अशीच चिन्हे आहेत.

पन्नास टक्के महिलांचे आरक्षण विचारात घेता महिला नगरसेवकांची संख्या 20 असल्याने महिलांमध्येही नगरसेवक पद प्राप्त करण्यासाठी चुरस होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास व एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेची आरक्षण रचना कशी असेल या बाबत स्पष्टता नाही. मात्र तरीही इच्छुंकानी तयारी सुरु केलेली आहे.

दरम्यान नगराध्यक्ष नगरसेवकातूनच निवडून देण्याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकच नगराध्यक्ष निवडण्याचीच शक्यता जास्त आहे. बारामती नगरपालिका आता अ वर्ग नगरपालिका आहे. येत्या काळात नगरपालिकेत आणखी तीन गावे समाविष्ट होणार आहेत, या पार्श्वभूमीवर नगरसेवक पद प्राप्त करण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!