स्थानिक

बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांची काळुराम चौधरी यांच्याविरोधात तक्रार

शासकीय कामकाजात अडथळा, जीवे मारण्याच्या धमक्या; कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी

बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांची काळुराम चौधरी यांच्याविरोधात तक्रार

शासकीय कामकाजात अडथळा, जीवे मारण्याच्या धमक्या; कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पंकज भुसे यांनी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव काळुराम चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, शारीरिक इजा पोहोचविण्याची भीती, तसेच अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी भुसे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, काळुराम चौधरी हे वारंवार नगरपरिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी यांच्या दालनात अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची व जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकविण्याची धमकी देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी काळुराम चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे वर्गणी किंवा रोख रकमेची मागणी केली होती. ही मागणी नाकारल्यानंतर नगरपरिषद कार्यालयात कचरा टाकणे, मुख्याधिकारी यांना मारहाण करण्याची उघड धमकी देणे आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणे असे प्रकार घडले असल्याचा आरोप आहे. यासंदर्भात यापूर्वीही नगरपरिषद प्रशासनामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.तसेच
दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्षांनी नगरपरिषद कार्यालयात नगरसेवकांची अनौपचारिक बैठक आयोजित केली होती. या बैठकीशी मुख्याधिकारी म्हणून आपला कोणताही वैयक्तिक संबंध नसताना, आपली मुलगी नगरसेविका असून तिला बैठकीसाठी बोलावले नाही, तसेच आपल्या सांगण्यानुसार कर्मचाऱ्यांची बदली केली नाही, या कारणांवरून काळुराम चौधरी यांनी व्हॉट्सॲप कॉल, अज्ञात मोबाईल क्रमांकांवरून फोन तसेच विविध व्हॉट्सॲप गटांमध्ये संदेश प्रसारित करून मुख्याधिकारी यांना मारहाण करणे, काळे फासणे, जीव घेणे व अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ७ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास काळुराम चौधरी यांच्या सांगण्यावरून ३ ते ४ अज्ञात व्यक्ती नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आल्या होत्या. या व्यक्तींचा उद्देश शारीरिक इजा करणे, मारहाण करणे व काळे फासणे असा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी धमकीवजा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय, काळुराम चौधरी यांनी फेसबुकवर दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करून मुख्याधिकारी यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक व नाव जाहीर केल्याने बदनामी झाली असून, त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमुळे मुख्याधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक, शारीरिक व जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या परिस्थितीमुळे शासकीय कर्तव्ये निर्भयपणे पार पाडणे अशक्य झाल्याचे सांगत, मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी स्वतःस व कुटुंबीयांसाठी कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस संरक्षण तातडीने देण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता वारंवार भंग होत असल्याने काळुराम चौधरी यांना नगरपरिषद कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात यावा,अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

Back to top button