स्थानिक

बारामती परिसरातील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा - अजित पवार

बारामती परिसरातील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा – अजित पवार

बारामती वार्तापत्र

कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. बारामती परिसरात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, पुणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करावी. बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नसावा. सर्वच नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश देऊन त्यांनी नागरिकांनी मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही केले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

घंटागाड्यांचे लोकार्पण

बैठकीपूर्वी बारामती नगरपरिषद आरोग्य विभागाला पियाजियो व्हेईकल प्रा. लि. बारामती यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) कचरा संकलनाकरीता तीन डिझेलची पिकअप वाहने, इतर कामकाजाकरीता दोन सीएनजी इंधनावरील पॅसेंजर ऑटो रिक्षा तसेच एक्सेल कंपनी कडून खरेदी करण्यात आलेल्या १० घंटागाड्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, पियाजिओ कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागाच्या पूजा बन्सल, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, गटनेते सचिन सातव, आदी उपस्थित होते.

विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा- अजित पवार

बारामती शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. श्री. पवार यांनी आज वसंतनगर येथील नीरा कालव्यावरील पुलाचे, जेष्ठ नागरिक संघाच्या व तालीम संघाच्या इमारतीचे नूतनीकरण, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालच्या प्रवेशद्वाराचे काम, दशक्रिया विधी घाटाचे तसेच कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, बाबूजी नाईक वाडा जुनी कचेरी येथील नवीन संरक्षण भिंतीचे (कंपाऊंड वॉल) आणि तांदुळवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भूमिगत पुलाच्या (अंडर ग्राउंड ब्रिज) कामाची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

सर्व अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत, कामे आकर्षक झाली पाहीजेत, चांगल्या संकल्पनाकाराकडून कामे करुन घ्यावीत. सर्व कामे अर्थसंकल्पित करून घ्यावीत, नियमात बसवून आणि ठराव करुनच कामे करावीत, निधीची आवश्यकता असेल तर पुरवण्या मागण्या सादर कराव्यात. कऱ्हा नदीचे संरक्षक बांधाचे (गॅबीयन वॉल) काम चालू असून नदीचे पाणी कोठेही थांबता कामा नये याकडे लक्ष द्या. कालव्यावरील अनावश्यक झाडे काढावीत, रस्त्यांची कामे व्यवस्थित करावीत असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी विविध कार्यान्वयन यंत्रणाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!