राजकीय

बारामती पोटनिवडणुकीत खळबळ: उमेदवारावर बोगस सहीचा आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जर हा आरोप खरा ठरला, तर संबंधित उमेदवाराचे अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती पोटनिवडणुकीत खळबळ: उमेदवारावर बोगस सहीचा आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जर हा आरोप खरा ठरला, तर संबंधित उमेदवाराचे अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती वार्तापत्र 

सध्या सुरू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत एक धक्कादायक माहिती समोर येत असून एका उमेदवाराने अर्ज दाखल करताना अनुमोदक (सूचक) म्हणून दाखवलेल्या व्यक्तीची बोगस सही वापरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित उमेदवार हा बारामतीबाहेरील असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक मतदारसंघाशी थेट संबंध नसतानाही त्यांनी अर्ज दाखल करताना एका प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीचे नाव अनुमोदक म्हणून वापरले. मात्र त्या व्यक्तीने अशी कोणतीही सही दिलेली नसल्याचा दावा केल्यामुळे हा प्रकार अधिकच संशयास्पद ठरत आहे.

या संदर्भात संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचे समजते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात काहीतरी “गोडबंगाल” असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारचा गैरप्रकार झाल्यास तो गंभीर मानला जातो आणि संबंधित उमेदवारावर कारवाई होऊ शकते.

दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हा आरोप खरा ठरला, तर संबंधित उमेदवाराचे अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघात अशा प्रकारच्या आरोपांमुळे निवडणूक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता असून, त्यानंतरच या वादावर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button