
बारामती पोलिसांचे नगरपालिका निवडणुकीत उल्लेखनीय कार्य
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
बारामती वार्तापत्र
नुकत्याच पार पडलेल्या बारामती नगर परिषद निवडणुकांच्या कालावधीत बारामती शहर पोलीस स्टेशनने बजावलेली जबाबदारी अत्यंत प्रशंसनीय ठरली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेतली.
निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बारामती शहर पोलिसांनी काटेकोर नियोजन करत प्रभावी बंदोबस्त ठेवला होता. विशेषतः निवडणुकीच्या दिवशी पोलिस अधिकारी व कर्मचारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतर्क राहून आपली कर्तव्ये पार पाडत होते.
बारामतीतील काही प्रभागांमध्ये निवडणूक चुरशीची व अटीतटीची झाल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
अशा संवेदनशील परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण ठेवणे, संभाव्य वाद टाळणे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे ही पोलिसांसाठी मोठी कसरत होती. तसेच निकालानंतर निघालेल्या मिरवणुकांच्या वेळीही शांतता राखणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे, यासाठी पोलिसांनी अत्यंत संयम व दक्षतेने काम केले.
या सर्व प्रयत्नांमुळे बारामती शहरात कुठेही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्याबद्दल बारामतीतील तमाम नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) श्रीशैल चिवडशेट्टी, ट्रॅफिक विभागाचे प्रमुख निलेश माने तसेच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. सुदर्शन राठोड यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस दलाने समन्वयाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम केले.
बारामती वार्तापत्र तसेच शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या कार्याला सलाम.






