बारामती पोलिस ॲक्शन मोडमध्ये;खून करुन पसार झालेले तीनजण अकलूज परिसरातून अटक
बारामती पोलिस ॲक्शन मोडमध्ये;खून करुन पसार झालेले तीनजण अकलूज परिसरातून अटक
गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल जप्त
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील प्रगतीनगर याठिकाणी अनिकेत सदाशिव गजाकस (वय २३) या युवकाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्या प्रकरणातील तिघांना १२ तासाच्या आत पोलीसांनी सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता.माळशिरस) येथून पाठलाग करुन जेरबंद केले.
गुरुवारी, १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ही खळबळजनक घटना घडली.
अनिकेतचा खून झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र बारामती पोलिसांनी १२ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या प्रकरणाने संपूर्ण बारामती हादरून गेली आहे.
वादातून खुनाचा थरार
अनिकेत आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर चॅटिंगवरून वाद झाला होता. हा वाद इतका चिघळला की आरोपींनी त्याचा खून करण्याचा कट रचला. अनिकेत प्रगतीनगर क्रिएटिव्ह अॅकॅडमीकडून टीसी कॉलेजकडे जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. नंदकिशोर अंभोरे (वय १९, रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी), महेश खंडाळे (वय २१, रा. यदुपाटीलनगर, तांदुळवाडी), आणि संग्राम खंडाळे (वय २१, रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी) या तिघांनी स्प्लेंडर दुचाकीवर येत अनिकेतवर कोयत्याने हल्ला केला. नंदकिशोर अंभोरे याच्या आतेबहिणीसोबत बोलण्यावरून वाद झाला होता. वादाच्या परिणामी तिघांनी मिळून अनिकेतचा निर्घृण खून केला.
पोलिसांची कारवाई
अनिकेतच्या भावाने, अभिषेक गजाकस यांनी, शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. आरोपींचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा (सीडीआर) मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपी सोलापूर जिल्ह्यातील अकलुज खंडाळी येथे असल्याची माहिती मिळाली.
बारामती पोलिसांनी शिताफीने आरोपींना शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणाची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, हवालदार अभिजित एकशिंगे, रामचंद्र शिंदे, आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी बजावली.
बारामतीत खळबळ
दरम्यान, अनिकेतच्या खुनाने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी बारामतीतील टीसी कॉलेज येथे असाच खुनाचा गुन्हा घडला होता. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयता विकणाऱ्यावर देखील करवाई
या घटनेत आरोपींनी ज्या व्यक्तीकडून कोयता विकत घेतला होता, त्या व्यक्तीची देखील चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी सांगितले.