
बारामती बंदचे आवाहन;भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाचा निषेध
सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत
बारामती वार्तापत्र
सकल हिंदू समाज यांच्या वतीने बारामती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुशील सोमाणी यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
ही घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली असून, कथित अपहरण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. संबंधित तरुणीच्या बेपत्ता होण्याबाबत अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास ती तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली.
विशेष म्हणजे संबंधित तरुणासोबत ती पोलीस ठाण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, अपहरणाच्या तक्रारीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, दोघांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेमागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान,या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठ आणि व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी शांततेत आणि संयमाने बंद पाळावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.






