बारामती बसस्थानकातील नादुरुस्त बसेस व शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कडक आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज

बारामती बसस्थानकातील नादुरुस्त बसेस व शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कडक आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली असून अनेक बसेस नादुरुस्त स्थितीत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जात असून विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आज सकाळी शाळेच्या गडबडीच्या वेळेत शिवाजी चौकाजवळ गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
बारामती–आसु मार्गावरील एसटी बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने ही बस रस्त्याच्या मध्यभागीच अडकून राहिली. त्यामुळे काही तास त्या परिसरात वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला.
विशेष म्हणजे त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना स्वतःच परिस्थिती हाताळावी लागली.
शिवाजी चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि संवेदनशील भाग मानला जातो. शाळा, बाजारपेठ आणि प्रमुख रस्ते यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. मात्र सकाळच्या शाळेच्या वेळेत पोलीस कर्मचारी किंवा वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसा स्टाफ नसल्याचे वारंवार दिसून येते.
यामुळे अव्यवस्थित वाहनतळ, रस्त्याच्या कडेला केलेली चुकीची पार्किंग आणि चहाच्या टपऱ्यांजवळील गर्दी यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट होते.
बारामती नगर परिषदेवर अपुऱ्या मनुष्यबळाचा तसेच नियोजनाच्या अभावाचा आरोप होत आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत नसल्याने शिवाजी चौकातील समस्या कायम वादग्रस्त ठरत आहे. दररोज किरकोळ वाद, वाहनधारकांमध्ये भांडणे आणि नागरिकांचा रोष अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
नागरिकांच्या मते, बसस्थानकातील बसेसची नियमित देखभाल व तपासणी करणे, वाहतूक नियंत्रणासाठी सकाळी व संध्याकाळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणे आणि अव्यवस्थित पार्किंगवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी आणि वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कडक आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या काळात वाहतूक समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






