बारामती मध्ये विषारी ताडी विक्रीचा पर्दाफाश..
मानवी जीवितास घातक अश्या केमिकल च्या तीस लिटर विषारी ताडीसह बारामती पोलिसांकडून दोघे अटकेत_

बारामती मध्ये विषारी ताडी विक्रीचा पर्दाफाश..
मानवी जीवितास घातक अश्या केमिकल च्या तीस लिटर विषारी ताडीसह बारामती पोलिसांकडून दोघे अटकेत_
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे मानवी जिवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लिटर विषारी ताडी व ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रासायनिक पावडर जप्त केली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायं.५ वाजण्याच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झारगडवाडी येथे एका इसमाकडून बेकायदेशीर व विषारी ताडीची विक्री सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात चिन्नया दत्तु गुत्तेदार (वय ३२, रा. झारगडवाडी) हा इसम घराच्या भिंतीच्या आडोशाला पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बकेटमध्ये विषारी ताडी विक्री करताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडून ३० लिटर मानवी जिवाला घातक अशी ताडी जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या घराची पाहणी केली असता, एका प्लास्टिक पिशवीत साखरेसारखी दिसणारी क्लोरोहायड्रेट (Chloral Hydrate) ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडर सापडली. चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली. तसेच सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबु भंडारी (रा.सणसर ता.इंदापूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यास सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. उर्वरित विषारी ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिन्नया गुत्तेदार व बाबु भंडारी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १२३ (दहा वर्षे शिक्षा) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस अमलदार मनोज पवार सौरभ तुपे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे जितेंद्र शिंदे दादा दराडे आफ्रिन शेख यांनी केली आहे.






