बारामती येथील व्ही. पी. के. बी. आय. ई. टी. मध्ये ‘टेकस्प्रिंट २०२६’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन
स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला

बारामती येथील व्ही. पी. के. बी. आय. ई. टी. मध्ये ‘टेकस्प्रिंट २०२६’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन
स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला
बारामती वार्तापत्र
बारामती येथील व्ही. पी. के. बी. आय. ई. टी. (विद्या प्रतिष्ठानाचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय) येथे गूगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘टेकस्प्रिंट २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर’ ही आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
सदर स्पर्धेचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच गूगल तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, शिक्षण आदी स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित व नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा होता.
स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला. गूगल जेमिनी, फायरबेस, गूगल एआय स्टुडिओ व गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्म यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी प्रभावी व अभिनव प्रकल्प सादर केले.
स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक 19/01/2026 रोजी दुपारी 3.00 वाजता महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पार पडली. अंतिम फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांची निवड करून प्रथम तीन क्रमांक प्राप्त संघांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. चैतन्य एस. कुलकर्णी (गूगल डेव्हलपर ग्रुप मार्गदर्शक व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञान विभागप्रमुख) तसेच प्रा. प्रदीप घोरपडे (सहाय्यक प्राध्यापक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञान विभाग) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गूगल डेव्हलपर ग्रुप प्रमुख आदित्य गुरव यांच्या नेतृत्वाखाली गूगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस संघाने स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
‘टेकस्प्रिंट २०२६’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, नवकल्पनांची जाणीव तसेच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होण्यास मोलाची मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, मार्गदर्शक प्राध्यापक व सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.






