आपला जिल्हा

बारामती येथे मध्यस्थी केंद्राची सुविधा उपलब्ध; स्थानिक नागरिकांना वैकल्पिक वाद निवारणाकरिता उपयुक्त

समाजात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी मध्यस्थी हा अत्यंत प्रभावी मार्ग-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन

बारामती येथे मध्यस्थी केंद्राची सुविधा उपलब्धस्थानिक नागरिकांना वैकल्पिक वाद निवारणाकरिता उपयुक्त

समाजात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी मध्यस्थी हा अत्यंत प्रभावी मार्ग-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन

बारामती वार्तापत्र

मध्यस्थी म्हणजे वाद मिटविण्याची सर्जनशील, मानवी आणि परस्पर सन्मान जपणारी प्रक्रिया आहे. न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यासाठीच नव्हे, तर समाजात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी मध्यस्थी हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

बारामती न्यायालयात मध्यस्थी केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना वैकल्पिक वाद निवारणाकरिता अधिक सोयीस्कर, जलद आणि समाधानकारक पर्याय उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांनी केले.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, बारामती येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थी केंद्राचे नुकतेच झालेल्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बारामती येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-२ व सत्र  न्यायाधीश बी. डी. शेलके जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील, बारामती वकील संघाचे अध्यक्ष प्रसाद खारतोडे,  उपाध्यक्ष अनुप चौगुले, हर्षदा सस्ते तसेच न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, मध्यस्थ वकील, इतर वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

श्री. बर्डे म्हणाले, वादाच्या दोन्ही बाजूंना ऐकून, त्यांची भावना, हक्क आणि गरजा समजून घेत समाधानकारक तडजोड घडवून आणणे हीच खरी न्यायप्रक्रियेची मानवी बाजू आहे. मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून न्याय अधिक जवळचा, आपुलकीचा आणि सकारात्मक संवादातून घडणारा होईल.

बारामती न्यायालयात नव्याने सुरू झालेले मध्यस्थी केंद्र स्थानिक नागरिकांना वाद निराकरणासाठी शांततापूर्ण, जलद आणि विनामूल्य असा प्रभावी पर्याय उपलब्ध करून देणार असून न्यायव्यवस्थेच्या सुलभीकरणामध्ये हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास श्री. बर्डे यांनी व्यक्त केला.

श्रीमती पाटील म्हणाल्या, विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकापर्यंत न्याय सहज, सुलभ आणि विनामूल्य पोहोचवणे. मध्यस्थी केंद्रे ही त्या उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी महत्त्वाची पायरी आहेत. बारामती येथे हे केंद्र सुरू होणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे, असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.

जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश हितेंद्र वाणी यांनी उपस्थित तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता व कार्यक्रम यशस्वीरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार  मानले.

Back to top button