बारामती-राहुरी पोटनिवडणुकांमध्ये महायुती एकजूट; सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन – रवींद्र चव्हा
सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.

बारामती-राहुरी पोटनिवडणुकांमध्ये महायुती एकजूट; सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन – रवींद्र चव्हाण
सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.
बारामती वार्तापत्र
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बारामती आणि राहुरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून लढवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादा पवार तसेच राहुरीतील शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका होत असल्याचे सांगत, चव्हाण यांनी बारामतीत कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेतल्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील छोट्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी कटुता विसरून या पोटनिवडणुकीत एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे,” असे ते म्हणाले.
निवडणुकीस अवघे दहा दिवस उरले असून, घराघरात जाऊन केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी त्यांचे ‘घड्याळ’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. तसेच पोटनिवडणूक असल्याने उदासीनता टाळून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उत्साही वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
राहुरी पोटनिवडणुकीबाबत
राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्ता तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याबाबत बोलताना, त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा कारणीभूत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. “सबका साथ, सबका विकास” या तत्त्वावर विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. धरणांतील गाळ काढणे, नगरपालिका विकासकामे आदी विषयांवर विचारविनिमय झाला.
राहुरी मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करून रोजगाराच्या संधी वाढवण्याची मागणी तनपुरे यांनी मांडली असून, त्यावर फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचेही चव्हाण म्हणाले. “ही पोटनिवडणूक असल्याने उमेदवारी न दिल्यास समाधान वाटेल, या भूमिकेमुळे त्यांनी अर्ज भरला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तनपुरे भाजपमध्ये येण्याबाबत
प्राजक्ता तनपुरे यांनी या निवडणुकीत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रभावामुळे अनेक कार्यकर्ते भाजपच्या विचारसरणीकडे आकर्षित होत आहेत. तनपुरे आमच्यासोबत आल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.”
सुनेत्रा पवार यांना पाठिंबा
आजचा कार्यक्रम हा कार्यकर्ता मेळावा असल्याचे सांगत, चव्हाण यांनी भाजप कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकेनुसार काम करतात असे स्पष्ट केले. “भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ स्तरावर पूर्ण ताकदीने सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






