बारामती रेल्वे स्थानकाची पोलिस चौकी बंद करण्याचा निर्णय
बारामती, केडगाव, खडकी आणि देहूरोड या चार पोलिस चौक्यांचे विलिनीकरण होणार

बारामती रेल्वे स्थानकाची पोलिस चौकी बंद करण्याचा निर्णय
बारामती, केडगाव, खडकी आणि देहूरोड या चार पोलिस चौक्यांचे विलिनीकरण होणार
बारामती वार्तापत्र
बारामती रेल्वे स्थानकाची पोलिस चौकीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. याची तातडीने अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान बारामतीची पोलिस चौकी दौंड पोलिस ठाण्यात विलिन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे विभागातील बारामती, केडगाव, खडकी व देहूरोड अशा चार पोलिस चौक्यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये येणाऱ्या काळात दौंडवरुन दोन रेल्वे पोलिस बारामतीच्या रेल्वे स्थानकावर चोवीस तास सेवा देणार असल्याची माहिती आहे.
बारामती दौंड बारामती हा रेल्वे प्रवास नाममात्र दरात होत असल्याने त्याचा वापर विद्यार्थी व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लोक मोठ्या संख्येने करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक व रेल्वे प्रवासात देखील प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा आहे. असे असतानाही बारामती रेल्वे स्थानकावरील चौकीच बंद करण्याचा अजब निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.
बारामतीला यापूर्वी १ पोलिस उपनिरिक्षक, १ सहायक फौजदार, २ हवालदार व २ कर्मचारी अशी ६ जणांची टीम कार्यरत होती. येथील चौकीही कार्यरत असायची. आता मात्र एक फतवा काढून अचानकच फक्त दोनच पोलिस कर्मचा-यांवर बारामती रेल्वे स्थानकाची चोवीस तासांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्याऐवजी कमी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.