क्राईम रिपोर्ट

बारामती शहरातील प्रगतीनगर भागात किरकोळ वाद टोकाला; दोन कुटुंबात तुफान हाणामारी

दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती शहरातील प्रगतीनगर भागात किरकोळ वाद टोकाला; दोन कुटुंबात तुफान हाणामारी

दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील प्रगतीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

प्रिया गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश सूर्यवंशी, पूजा सूर्यवंशी, पूजा यांचे काका व भाऊ निलाखे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (दि. 2) सकाळी आठ वाजता ही घटना घडली.

फिर्यादी पती सुहास, दोन्ही मुले, नणंद सुप्रिया गावडे, दीर सूरज गावडे, नातेवाईक विजय सांगळे यांच्यासह घरी होत्या. त्यांचा मुलगा स्वयम हा दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. त्या वेळी सूर्यवंशी यांचा मुलगा देवांश हा रडत होता. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याने फिर्यादीने देवांश याला रडू नको असे सांगितले. त्यावर राकेश सूर्यवंशी यांनी तुम्हाला लय माज आला आहे का, खाली या तुमचा माज उतरवतो अशी भाषा वापरली.

त्यामुळे फिर्यादीच्या पतीने महिलांशी या पद्धतीने बोलतात का अशी विचारणा केली असता त्यांनी सुहास गावडे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सूरज गावडे, विजय सांगळे यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.

सूरज यांचा मोबाईल राकेश यांनी हातातून हिसकावून घेतला. त्यानंतर पूजा राकेश सूर्यवंशी हिचे काका व भाऊ निलाखे यांनीही या कुटुंबाला मारहाण केली. या घटनेत सुहास गावडे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. तर राकेश रमेश सूर्यवंशी यांनीही फिर्याद दिली. त्यानुसार सुहास गावडे, प्रिया गावडे, सुप्रिया सांगळे व त्यांचा पती तसेच अन्य एक नातेवाईक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रिया व सुहास यांनी सूर्यवंशी यांच्या मुलांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करू नका असे सांगितले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. काही वेळाने गावडे कुटुंब घरात आले. त्यावेळी सुप्रिया सांगळे यांच्या पतीने फिर्यादीच्या पत्नीचा हात पिरगळला. झटापटीत मंगळसूत्र ओढून तोडण्यात आले. सुप्रिया यांनी फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली. सुहास गावडे यांनी फिर्यादीला घरातून सोसायटी पार्किंगमध्ये आणत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!