रस्ता सुरक्षा अभियान बारामती आरटीओची महिलांची दुचाकी प्रबोधन रॅली
अपघातांमध्ये सुमारे १५ टक्के घट

रस्ता सुरक्षा अभियान बारामती आरटीओची महिलांची दुचाकी प्रबोधन रॅली
अपघातांमध्ये सुमारे १५ टक्के घट
बारामती वार्तापत्र
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी दुचाकी प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा उद्देश वाहनचालकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
माळेगाव बुद्रुक येथील शरद सभागृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे, प्राचार्य संदीप शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर माळेगाव नगरपंचायतीच्या वेशीपासून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॅम्पसपर्यंत महिलांची दुचाकी प्रबोधन रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महिलांनी रस्ते सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
यावेळी रस्ता सुरक्षाविषयी पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. शिवनगर येथील डिप्लोमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या पथनाट्यातून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हेल्मेट परिधान करणे, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच अपघात घडल्यानंतर ‘गोल्डन अवर्स’मध्ये जखमी व्यक्तीस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात रस्ते वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालकांची जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अभिनेते रामभाऊ जगताप आणि भरत शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित करताना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी रस्ता सुरक्षेला चार प्रमुख भागांमध्ये विभागले असून, प्रत्येक स्तरावर नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.
याशिवाय त्यांनी पोस्ट विभागाकडून केवळ ५५० रुपयांचा विमा कवच घेतल्यास अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते, अशी महत्त्वाची माहिती दिली. बारामती आरटीओ कार्यालयाने राबविलेल्या सातत्यपूर्ण जनजागृती उपक्रमांमुळे गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये सुमारे १५ टक्के घट झाली असून, अपघातांतील मृत्यूदरात ८ टक्क्यांनी घट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अभियानामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी सकारात्मक जागृती निर्माण होत असून, सुरक्षित व जबाबदार वाहनचालक घडविण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






