क्राईम रिपोर्ट

बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई; ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, 100 इंजेक्शनसह आरोपी अटकेत

५०० रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई; ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, 100 इंजेक्शनसह आरोपी अटकेत

५०० रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर “टर्मिन” इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

शरीर क्षमता वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि गंभीर दुष्परिणाम घडवू शकणाऱ्या 100 “टर्मिन” इंजेक्शनसह एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दिनांक २३ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, बारामती शहरातील एम.ई.सी.बी. कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून धाड टाकली. यावेळी अॅक्टीव्हा स्कुटीवर बसलेल्या गौरव बाळासो जाधव (वय 24, रा. आमराई, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान स्कुटीच्या डिकीत MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP अर्थात “टर्मिन” नावाने ओळखली जाणारी १०० सिलबंद इंजेक्शन आढळून आली. आरोपीकडे इंजेक्शन खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत ही इंजेक्शने जिम आणि बॉडी बिल्डिंगसाठी प्रती बाटली सुमारे ५०० रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत सुमारे ३३ हजार ४०० रुपयांची इंजेक्शने आणि ५० हजार रुपयांची अॅक्टीव्हा स्कुटी असा एकूण ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध Schedule-H प्रवर्गातील असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणे बेकायदेशीर आहे. चुकीच्या वापरामुळे भ्रम, झटके, हृदयगती मंदावणे आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सदर आरोपीकडून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि जिम नेटवर्कबाबत सखोल तपास सुरू असून या कारवाईमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button