बारामती शासकीय मेडिकल कॉलेज च्या प्रशासनाकडून अजित दादांच्या सुचनाला केराची टोपली
काही विभाग धूळ खात पडून
बारामती शासकीय मेडिकल कॉलेज च्या प्रशासनाकडून अजित दादांच्या सुचनाला केराची टोपली
काही विभाग धूळ खात पडून
बारामती वार्तापत्र
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून राज्य सरकारने बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची निर्मिती केली. परंतु, शासकीय यंत्रणा तसेच विभागप्रमुखांच्या उदासीनतेमुळे रुग्णांना रुग्णालयात सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
येथील काही विभाग धूळ खात पडून आहेत. परिसरात मोकाट कुत्र्यांच्या मुक्त वावर आहे. सुस्त प्रशासनाचा फटका बारामतीकरांना बसत आहे.
विभागप्रमुखांचा मनमानी कारभार सुरू आहे. यात बदल होणार तरी कधी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुसज्ज रुग्णालय उभारून 5 वर्षांचा कालावधी झाला, तरी रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू झालेले नाही. न्याय व वैदिक विभागावर देखील रोष व्यक्त होत आहे.
रुग्णालयात दि. 7 व 8 डिसेंबर रोजी न्याय व वैदक विभागामार्फत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषद आयोजित केलेल्या विभागामार्फत किमान शवविच्छेदन विभाग या इमारतीत होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे हा विभाग धूळ खात पडून आहे. अत्यंत सुसज्ज इमारती, आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
परंतु, अकार्यक्षमतेमुळे रुग्णालयाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नाही. या ठिकाणी शवविच्छेदनाची व्यवस्था नसल्याने रुई अथवा सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात मृतदेह न्यावा लागतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये शवविच्छेदन केले जाते. याशिवाय येथीलच डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे येथे मिळत नाहीत. ती बाहेरून मेडिकलमधून घ्यावी लागतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
अधिकार्यांची उदासीनता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री त्यांच्यामुळेच रुग्णालयाला मिळाली. मात्र, त्याचा वापर करण्याबाबत उदासीनता दिसून येते. डॉक्टर आठवड्यातील ठरावीक दिवशीच उपस्थित असतात. कारभार सुधारण्यासह रुग्णांना चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना अजित पवार यांनी अनेकदा दिल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.