बारामती : सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती; ग्राहकांमध्ये नाराजी
घरगुती सिलिंडरमध्येही सुमारे ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बारामती : सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती; ग्राहकांमध्ये नाराजी
घरगुती सिलिंडरमध्येही सुमारे ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
मध्यपूर्वेतील इराण-इराक व अमेरिकेमधील तणावपूर्ण युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्वयंपाक गॅस पुरवठ्यावरही होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बारामतीसह अनेक भागांत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्राहकांना सिलिंडर बुकिंगसाठी वितरकांचा फोन क्रमांक डायल केल्यावर कॉल लागत नसल्याचा अनुभव येत आहे. काही वेळा कॉल लागल्यानंतर लगेच डिस्कनेक्ट होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून गॅस मिळणार का, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असतानाही बुकिंग प्रक्रिया थांबविल्याची तक्रार हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे ९० रुपयांची वाढ झाली आहे, तर घरगुती सिलिंडरमध्येही सुमारे ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतरही बुकिंग बंद असल्याने हॉटेल, खानावळी व खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांनी शासनाकडे निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, काही ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंगचा पर्याय ऑनलाईन माध्यमातून बुकिंग केल्याचे सांगितले. मात्र अशा बुकिंगनंतरही सिलिंडर मिळण्यासाठी सुमारे ३० दिवसांची प्रतीक्षा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक घरांमध्येही गॅस पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.
याचदरम्यान गॅस सिलिंडर वितरणाच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार ग्राहकांना पहिले सिलिंडर मिळाल्यानंतर किमान २१ दिवसांनंतरच दुसरे सिलिंडर मिळणार आहे. कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हा नियम लागू केल्यामुळे २१ दिवसांपूर्वी दुसरे बुकिंग स्वीकारले जात नाही.
मात्र अधिकाऱ्यांनी देशात गॅस सिलिंडरची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रत्येक ग्राहकाला आवश्यक तेवढे सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गॅस रिफिलिंग प्लांट आता रविवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. युद्धाच्या दहाव्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात सुमारे १७ टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल किंमत १०७ डॉलरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
तथापि, जागतिक बाजारातील अस्थिरतेनंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तातडीने वाढविण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. देशातील ऊर्जा साठे सुरक्षित असल्याने सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तातडीचा धोका नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
तरीही गॅस बुकिंगमधील अडचणी आणि दरवाढ यामुळे बारामतीतील हॉटेल व खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात असून, पुरवठा सुरळीत कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






