बारामती; सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठिंबा जाहीर
उमेदवारीला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात

बारामती; सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठिंबा जाहीर
उमेदवारीला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात
बारामती वार्तापत्र
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, यशवंत सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत निर्माण केलेली विकासाची गती आणि तालुक्यातील सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे यशवंत सेनेने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे, दत्ता माळशिकारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अधिकृतरित्या पोटनिवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
यावेळी प्रा. दांगडे पाटील म्हणाले की, “बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेना ही राज्यातील धनगर समाजाला एन.टी. आरक्षण मिळवून देणारी नोंदणीकृत संघटना आहे. समाजाच्या एस.टी. प्रवर्ग आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.”
बारामतीच्या सर्वांगीण विकासात तसेच सहकार, पणन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनगर समाजाला वेळोवेळी संधी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली विकासाची गती आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी यशवंत सेना सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर, सचिव नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाबा भोजने, दिलीप गडदे, गोविंद नरुटे आदींच्या उपस्थितीत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या ठरावानुसार बारामती मतदारसंघात प्रचारासाठी बैठका आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या पाठिंब्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






