
इंदापूरमध्ये मध्ये होणार लॉन टेनिसचे सिंथेटीक मैदान
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहराच्या व तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या क्रीडा संकुल येथे लॉन टेनिसचे सिंथेटीक मैदान उभारण्यात येणार आहे.अशी माहिती
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सिंथेटीक मैदानाकरिता सन २०२१-२२ वर्षाच्या जिल्हा वार्षिक निधीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पहिल्या टप्प्यात ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच क्रीडा विकासाचा भाग म्हणून सरस्वती नगर ते क्रीडा संकुल या रस्त्याकरिता २० लाख व रस्त्याच्या बाजूस विद्युतीकरण करण्यास १० लाख रुपये मंजूर करीत असल्याची घोषणा मंत्री भरणे यांनी केली आहे.
यापूर्वी क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल, स्केटिंग, बॅडमिंटन हॉल,४०० मीटर धावणे मार्ग, क्रिकेट मैदान, फुटबॉल, धनुर्विद्या, कबड्डी, खो-खो इत्यादी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागातील खेळाडू व नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता संकुलाचा दिवसेंदिवस कायापालट राज्यमंत्री भरणे यांच्या माध्यमातून होत आहे.
इंदापूर शहरातील नागरिकांसाठी सुमारे २ करोड रुपयांच्या जलतरण पुलाची निर्मिती लवकर होणार असून या बाबतची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.