“बालिकेवरील अत्याचार प्रकरणात बारामती पोलिसांची तात्काळ कारवाई – विकृत आरोपी पुन्हा जेलमध्ये”
अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे

“बालिकेवरील अत्याचार प्रकरणात बारामती पोलिसांची तात्काळ कारवाई – विकृत आरोपी पुन्हा जेलमध्ये”
अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 129/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 352 तसेच बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 8, 12 प्रमाणे अवघ्या 10 वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात आरोपी हसन शमशुध्दीन झारे उर्फ राजु, रा. अनंतआशा नगर, ता. बारामती, जि. पुणे हा फिर्यादीच्या शेजारी राहणारा असून, त्याने परिचयाचा गैरफायदा घेत बालिकेस चॉकलेटचे आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत देखील आरोपीने यापूर्वी अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे.
सदर आरोपीचे वय सुमारे 52 वर्षे असून, त्याच्यावर यापूर्वी देखील महिला अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल आहे. सन 2009 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 245/2009, भारतीय दंड विधान कलम 376, 506 तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट कलम 3, 12 अन्वये दाखल गुन्ह्यात, त्याने त्याची वय 32 वर्षे असताना, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्यास 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही आरोपीच्या मनोवृत्तीत कोणताही बदल न होता पुन्हा अशाच प्रकारचा गंभीर गुन्हा केल्याची बाब अत्यंत चिंताजनक व गंभीर आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी महिला तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला येताच आरोपी हा दिनांक 05/04/2026 रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरातून पळून गेला होता. तथापि, बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ हालचाल करून तांत्रिक पुरावे व स्थानिक माहितीच्या आधारे बारामती शहरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून आरोपीचा माग काढला. आरोपी शहर सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बारामती एस.टी. स्टँड परिसरात त्यास अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार सुलतान डांगे, पोलीस शिपाई अमोल देवकाते, शासकीय वाहनचालक पोलीस शिपाई ऋषिकेश जाधव, पोलीस शिपाई राहुल बडे व पोलीस शिपाई गौरव ठोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर आरोपीस अटक करण्यात येऊन मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी (जेल कस्टडी) सुनावण्यात आली असून, तो सध्या येरवडा केंद्रीय कारागृहात दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती संध्याराणी देशमुख या, मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
बारामती शहर पोलीस महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून, अशा विकृत व पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर, तातडीची व निर्णायक कारवाई करण्यात येईल. महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी बारामती शहर पोलिसांची “झिरो टॉलरन्स” नीती कठोरपणे अंमलात असून, भविष्यातही तीच भूमिका कायम राहील.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
• मुलांना Good Touch – Bad Touch याबाबत नियमित शिक्षण द्यावे.
• चॉकलेट, भेटवस्तू किंवा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, असे स्पष्ट समजावावे.
• मुलांना कोणाच्याही घरात किंवा एकांत ठिकाणी एकटे जाऊ न देणे.
• अनुचित स्पर्श किंवा भीती वाटल्यास मुलांनी तात्काळ पालक/शिक्षक/पोलीसांना माहिती द्यावी.
• पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवून त्यांच्या वागणुकीतील बदल लक्षात घ्यावेत.
समाजासाठी संदेश
“बालकांचे संरक्षण ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सजग पालक, सतर्क नागरिक आणि तत्पर पोलीस यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच सुरक्षित, निर्भय समाजाची निर्मिती होऊ शकते.”
बारामती शहर पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






