भीमा नदीच्या पात्रात शीर व हातपाय वेगळे झालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला; इंदापूर पोलिसांनी दोन तरुणांना घेतले ताब्यात
पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला छडा..

भीमा नदीच्या पात्रात शीर व हातपाय वेगळे झालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला; इंदापूर पोलिसांनी दोन तरुणांना घेतले ताब्यात
पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला छडा..
बारामती वार्तापत्र
गणेशवाडी भागात भीमा नदीच्या पात्रात शीर व हातपाय तोडलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरुन इंदापूर पोलीसांनी अवघ्या सहा तासात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले,महेश प्रभाकर सोनवणे (दोघे रा.टाकळी (टे)ता. माढा जि.सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.संजय महादेव गोरवे (वय २३ वर्षे,रा.टाकळी (टें),ता. माढा,जि.सोलापूर) असे या प्रकरणातील मृत युवकाचे नाव आहे.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दाजी देठे,ए.बी. जाधव,हवालदार के.बी.शिंदे ,पोलीस नाईक जगदीश चौधर, पोलीस शिपाई एस.जी.नगरे, अमोल गायकवाड, आरिफ सय्यद यांनी अवघ्या सहा तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या संदर्भात माहिती देताना हवालदार शिंदे यांनी सांगितले की,दि.१७ जानेवारी रोजी मयत संजय गोरवे हा बेपत्ता झाला होता.दुस-या दिवशी त्याच्या नातलगांनी टेंभुर्णी (जि.सोलापूर) पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती.दि.२० रोजी सकाळी सात वाजता गारअकोला ते गणेशवाडी या रस्त्यावरील भीमा नदीच्या पुलाखाली नदीपात्रात शीर व हात पाय धडावेगळे केलेल्या अवस्थेतील अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांच्या सूचनेनुसार तपास सुरु करुन दुपारी दोन वाजता टेंभुर्णी येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.पुढील तपास सुरु आहे.