बिल मंजूरीसाठी,२५ हजारांची लाच स्वीकारताना बारामतीतील ग्रामसेवकाला रांगेहाथ पकडले; ‘एसीबी’ची कारवाई
60 हजार रुपयांची मागणी केली होती.

बिल मंजूरीसाठी, २५ हजारांची लाच स्वीकारताना बारामतीतील ग्रामसेवकाला रांगेहाथ पकडले; ‘एसीबी’ची कारवाई
60 हजार रुपयांची मागणी केली होती.
बारामती वार्तापत्र
पळशी (ता. बारामती) येथे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी (ता.07) रंगेहाथ पकडले.
कांता बापूराव काळाणे (वय -57, पद- ग्रामसेवक, पळशी ग्रामपंचायत कार्यालय ता. बारामती) असे रंगेहाथ पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी एका सरकारी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अधिकृत सरकारी ठेकेदार असून, त्यांनी पळशी येथील सिमेंट बंधाऱ्याचे 16 लाख 46 हजार रुपये किंमतीचे काम पूर्ण केले होते. यापैकी 14 लाख 96 हजार रुपयांचे बिल मंजूर करताना कांता काळाणे यांनी तक्रारदाराकडे 4 टक्के रक्कम म्हणजेच 60 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 30 हजार रक्कम त्यांनी यापूर्वी रोख स्वरूपात स्वीकारली होती.
उर्वरित दीड लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी कांता काळाणे हा 30 हजार रुपयांची वारंवार मागणी करीत होता. त्यामुळे तक्रारदाराने काल मंगळवारी (ता. 06) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी (ता. 07) लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता कांता काळाणे यांनी तडजोडीअंती 25 हजार रुपये पळशी गावाच्या सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या सापळा कारवाईत त्यांना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी कांता बापूराव काळाणे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.