क्रीडा

म.ए.सो. च्या मैदानावर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले) रंगतदार सामन्यांनी गाजली.

स्पर्धेत तब्बल ४७ संघांनी सहभाग नोंदवला होता.

म.ए.सो. च्या मैदानावर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले) रंगतदार सामन्यांनी गाजली

स्पर्धेत तब्बल ४७ संघांनी सहभाग नोंदवला होता.

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती या मैदानावर तालुकास्तरीय (मुलांची) व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही संपन्न झाली. १४, १७ व १९ वर्ष वयोगटासाठी झालेल्या या स्पर्धेत तब्बल ४७ संघांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले व तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र खोमणे यांच्या उपस्थितीत झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे सर अध्यक्षस्थानी होते.
प्रास्ताविक श्री. दादासाहेब शिंदे यांनी करताना, खेळांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले. मान्यवरांनी मनोगतातून ‘क्रीडांगणातली मेहनत आयुष्यभराची शिस्त आणि सहकार्याची भावना रुजवते, असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.’ त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मैदानांचे उद्घाटन झाले.
१४ वर्षे वयोगटात १२ संघ, १७ वर्षे वयोगटात ८ संघ तर १९ वर्षे वयोगटात तब्बल २७ संघ मैदानात उतरले. दिवसभर चाललेल्या सामन्यांत खेळाडूंनी दमदार स्मॅश, ब्लॉक्स व नेटवरील वेगवान खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सामन्यातील टप्प्याटप्प्याने वाढणारा थरार आणि स्पर्धात्मकता यामुळे मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती उत्साहाने टिकून राहिली.
खेळाडूंच्या जिद्दीमुळे अनेक सामने ‘नेल बायटिंग’ झाले. प्रेक्षकांच्या जयघोषामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक वाढला.
संपूर्ण स्पर्धेचे नियोजन श्री. कुमार जाधव सर यांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल गावडे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. गणपत जाधव सर यांनी मानले. स्पर्धा भाग्यपत्रिका श्री. शंकर घोडे सर, निवेदन श्री. रवींद्र गडकर सर यांनी केले.
पंच म्हणून श्री. किरण पवार व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले. त्यांच्या अचूक निर्णयांमुळे सामने अधिक सुरळीत व सुस्पष्टतेने पार पडले. व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यासाठी प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष श्री अजय पुरोहित सर व महामात्र श्री डॉ. गोविंदराव कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन व पंचांचे अचूक नियोजन यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.संपूर्ण कार्यक्रमाचे व स्पर्धेचे छायाचित्रण श्री स्वप्निल गोंजारी यांनी केले.

Back to top button